Labels

आपल्याकडील शैक्षणिक साहित्य प्रकाशित करावयाचे असल्यास संपर्क या लिंकला जाऊन दिलेल्या क्रमांकावर वा email वर आपले साहित्य पाठवावे. जेणेकरून त्याचा वापर इतरांना होवू शकेल..........

लोकसहभागातून करावयाची शालेय कामे

शाळा व लोकसहभाग :


शाळा आणि समाज हे दोन अविभाज्य घटक आहेत. समाजासाठी शाळा व शाळेसाठी समाज    असतो. व्यक्तिमत्वविकास व त्यातून समाज विकास हे शाळेचे प्राथमिक ध्येय आहे. तर समाज साहाय्याने शाळेचा विकास साधणे हेही तितकेच गरजेचे असते. त्यासाठी शाळेच्या कार्यामध्ये लोकांचा व समाजाचा सहभाग घेणे अगत्याचे ठरते.
भारत सरकारच्या शिक्षण हक्क अधिनियम RTE २००९ नुसार शालेय कार्यामध्ये समाजाचा सहभाग घेणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याबरोबरच महाराष्ट्र शासनाने १६ मे १९९६ व २४ ऑगस्ट २०१० रोजी पारित केलेल्या परिपत्रकान्वये तसेच माध्यमिक शाळा संहितेमधील नियम क्रमांक ३.२ मध्ये शाळेत शिक्षक पालक सभेच्या माध्यमातून शालेय अभ्यासक्रम तसेच विद्यार्थी व शिक्षक यांच्या समस्या सोडविणे असे ध्येय निश्चित करण्यात आले आहे.
१७ जून २०१० च्या महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकान्वये शिक्षणाची उद्दिष्टे पूर्ततेत विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साध्य करत असतानाच सामाजिक न्याय, लोकशाही, मानवी मुल्य प्रस्थापित करण्यासाठी शिक्षणामध्ये लोकसहभाग घेणे अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगण्यात आले आहे.  शाळेमध्ये लोकसहभाग वाढवावा हे ध्येय समोर ठेवून स्थानिक पातळीवर शाळा व्यवस्थापन समितीची रचना करण्याचे सर्व शासकीय व खाजगी शिक्षण संस्थांना बंधनकारक करण्यात आले आहे.
वरील सर्व संदर्भांचा विचार करता शासन ध्येय असे दिसून येते की, विद्यार्थ्यांचा विकास व शिक्षण संकल्पना साकारण्यासाठी अध्ययन-अध्यापन कार्यामध्ये समाज पालक किंवा लोकसहभाग घेणे व त्या माध्यमातून विद्यार्थी विकास करणे अपेक्षित आहे.

शालेय कार्यात समाज किंवा लोकसहभागाची उद्दीष्ठे:


१.               समाज व शाळा संबंध जोपासणे.
२.               शाळेची विश्वासहर्ता वाढविणे.
३.               शालेय समस्या सोडवणे.
४.               शालेय कार्यावर नियंत्रण प्रस्थापित करणे.
५.               सहशालेय उपक्रमात समाज सहकार्य मिळवणे.
६.               समाजातील ज्येष्ठ व प्रतिभावंत व्यक्तींच्या ज्ञानाचा व अनुभवाचा वापर विद्यार्थी विकासासाठी करणे.
७.               शालेय विकासासाठी आर्थिक मदत प्राप्त करून घेणे.
८.               शालेय विकासामध्ये लोकांकडून भौतिक सामग्री, निधी, मनुष्यबळ प्राप्त करणे.
९.               विद्यार्थी उपस्थिती वाढवणे.
१०.         शालेय वातावरण प्रसन्न, आकर्षक व सुरक्षितता करणे
११.         समाज सहकार्यातून शालेय सामग्रीचे संवर्धन करणे.
१२.         समाजामध्ये परस्परसहकार्य भावना जोपासणे
१३.         विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक, सामाजिक स्वच्छता व श्रमप्रतिष्ठा, नैतिक मूल्य, सामाजिक ऐक्य, एकता, विषमता निर्मूलन इत्त्यादी बाबींची जोपासना करणे.

वरील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी शाळेमध्ये लोकसहभाग घेणे अत्यंत गरजेचे आहे.

लोकसहभाग व सामाजिक सहभागातून करावयाची शालेय कार्ये :

लोकसहभाग व सामाजिक सहभागातून करावयाची कामांचे वर्गीकरण केल्यास त्याचे चार विभागांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते.
१.     शैक्षणिक कार्यातील सहभाग
२.     सहशालेय उपक्रमातील सहभाग
३.     आर्थिक बाबींमधील सहभाग
४.     श्रम किंवा मनुष्यबळ सहभाग


१.     शैक्षणिक कार्यातील लोकसहभाग:
समाजातील प्रतिभावंत, अनुभवी, उच्चविद्याविभूषित व्यक्तींच्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग विद्यार्थी समुपदेशन व मार्गदर्शन करण्यासाठी केला जाऊ शकतो.
त्याबरोबरच जीवनामध्ये अनुभव हीच सर्वात मोठी शिदोरी आहे व अशा अनुभवरुपी शिदोरीचे गाठोडे  ज्येष्ठ नागरिकांकडे असते.  म्हटले जाते की ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरील प्रत्येक सुरकुती हि एक स्वतंत्र अनुभव कथा असते. हे अनुभव विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरू शकतात.
लोकसहभागातून करावयाचे शैक्षणिक कार्य :
१.               विद्यार्थी मार्गदर्शन
२.               विद्यार्थी समुपदेशन  
३.               अनुभवकथन सोहळा
४.               ज्येष्ठ व्यक्तींचा शालेय तास

२.              सहशालेय उपक्रमातील सहभाग :
सहशालेय उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधताना शाळेला अनेक अडचणी येऊ शकतात या अडचणी दूर करण्यासाठी सहशालेय उपक्रमाचे नियोजन करत असताना लोक सहभाग घेणे योग्य ठरते.

लोकसहभागातून राबविल्या जाऊ शकणाऱ्या सहशालेय उपक्रमांची यादी:
१.               वार्षिक स्नेहसंमेलन
२.               वृक्षारोपण कार्यक्रम
३.               राष्ट्रीय सण समारंभ आयोजन
४.               आरोग्य शिबीर
५.               महिला किंवा बालिका मेळावा
६.               समुपदेशन
याव्यतरिक्त प्रसंग निहाय व कल्पकतेने बऱ्याच सहशालेय उपक्रमांमध्ये लोकसहभाग किंवा समाज सहकार्य मिळवता येऊ शकते.


३.              आर्थिक सहभाग:
विकास व अर्थ (पैसा) हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. विकास साधण्यासाठी अर्थ किंवा पैसा आवश्यक आहे. मग तो उपक्रम राबवणे, शाळेचा भौतिक विकासात, शालेय इमारतीची डागडुजी किंवा बांधणी करणे, शैक्षणिक साहित्य निर्मिती अश्या अनेक कार्यसाठी पैशाची गरज पडत असते.  बऱ्याचदा शासनाकडून प्राप्त झालेल्या निधी कमी पडत असतो अशा वेळी समाजातील व्यक्तींकडून मदत किंवा देणगी स्वरूपात निधी प्राप्त करून घेणे  गरजेचे असते.  मात्र देणगीदारांची इच्छा  व परिस्थिती या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. निधीसाठी कुठलीही शाळा समाजावर बंधन टाकू शकत नाही.

आर्थिक सहभागातून उपक्रम:
१.               शाळा कृतज्ञता निधी कार्यक्रम
२.               शाळा विकास निधी निर्मिती
३.               वृक्षारोपण कार्यक्रम
४.               संगणक ( डिजिटल साहित्य )खरेदी
५.               परिसर सुशोभीकरण
६.               शालेय रंगरंगोटी
७.               फर्निचर निर्मिती
८.               गणवेश
९.               स्वागतकमन व संरक्षण भिंत
१०.         शैक्षणिक साहित्य निर्मिती किंवा खरेदी
११.         इमारत  बांधकाम, डागडुजी
१२.         क्रीडामैदान निर्मिती
१३.         ग्रंथालय समृद्धी


४.              श्रम किंवा मनुष्यबळ सहभाग :
सामाजिक कार्यात पैश्या एवढेच महत्त्व मनुष्यबळाला आहे. एकमेकांना सहकार्यातून व मदतीतून महाकाय सेतू बांधला जाऊ शकतो. त्याप्रमाणे एक आकर्षक, सुशोभित, संस्कार पूरक शालेय वातावरण तयार करण्यासाठी मनुष्याबळा चे योगदान मोलाची ठरू शकते.
श्रम किंवा मनुष्यबळातून करावयाची कामे:
१.               परिसर स्वच्छता
२.               सुंदर शालेय परिसर
३.               शालेय इमारत बांधकाम किंवा डागडुजी
४.               संरक्षण भिंत
५.               फर्निचर निर्मिती
६.               शालेय बगीचा निर्मिती
७.               क्रीडा मैदान निर्मिती
८.               वृक्षारोपण
गरजेनुसार मनुष्यबळाची निगडीत व इतर कार्यही आपण याद्वारे करू शकतो.


“विना सहकार नाही उद्धार” या उक्तीप्रमाणे सामाजिक सहकार्याशिवाय शाळेचा विकास साधणे म्हणजे अशक्यप्राय आहे. हे साध्य करण्यासाठी शालेय व्यवहारात पारदर्शकता व समाज विश्वास जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण शाळेवर केवळ पुस्तके शिकवायचे नाहीत तर उद्याची आधुनिक, संस्कारक्षम, सर्वगुणसंपन्न पिढी घडवण्याची जबाबदारी आहे.

उपक्रमशीलता व नवकल्पकतेच्या माध्यमातून यापेक्षाही नवोदित उपक्रम शाळा राबवू शकते.

2 comments:

Unknown said...

अतिशय छान

jitendra said...

अप्रतिम लेख