Labels

आपल्याकडील शैक्षणिक साहित्य प्रकाशित करावयाचे असल्यास संपर्क या लिंकला जाऊन दिलेल्या क्रमांकावर वा email वर आपले साहित्य पाठवावे. जेणेकरून त्याचा वापर इतरांना होवू शकेल..........

दहा नैतिक मूल्य

नैतिक मुल्ये:-
प्रस्तावना:
आदिम कालखंडापासून मानवी उत्क्रांतीवादाचा अभ्यास केला असता आपल्या निदर्शनास येईल की, आदिम काळात मानव मूलभूत गरजा भागवत जगत होता. या गरजा भागवत असताना त्याने त्याच्याकडे असलेल्या बुद्धीचा व कौशल्यांचा वापर करून निसर्गावर मात करत इतर प्राण्यांचा व नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर करून विकास साधून घेतला. कालांतराने याच मानवाने या सर्व गोष्टींचा वापर करून विकासाबरोबर संस्कृती, शिष्टाचार, शिक्षण, तत्त्वज्ञान, जीवनमूल्य सारख्या संकल्पना साकार करायला सुरुवात केली व त्यातूनच माणूस हा सुसंस्कृत बनला. यावेळी शिक्षण इतिहासात ज्ञान व प्रगती हा शिक्षणाचा प्रमुख पैलू असल्याचे दिसून येईल.


पृथ्वीवरील प्रत्येक साधन सामग्रीचा वापर करून आधुनिकतेची कास धरून चंद्र नव्हे तर मंगळापर्यंत जाऊन पोहोचला. मात्र इकडे माणूसच माणूसपण विसरून गेला व प्रगतीच्या मार्गामध्ये अनैतिकता, व्यभिचार, दुर्वर्तन व परिणामी विध्वंस यासारखे अडसर येताना दिसून यायला लागले. या जगामध्ये मानवाला मानव बनून जगणे हे सर्वात मोठे आव्हान असल्याचे दिसून येऊ लागले.

हल्ली शिक्षणाचा अर्थ केवळ पाठ्यपुस्तक,अभ्यासक्रम, परीक्षा, निकाल, अव्वल नंबर असाच अभिप्रेत झाला आहे. या जगाला स्पर्धेचे जग म्हणून संबोधण्यात येते, मात्र या स्पर्धेच्या जगामध्ये ‘स्पर्धेची परीक्षा’ का ‘परीक्षेची स्पर्धा’ याचाच अर्थ स्पष्ट होत नाही. त्यामुळे केवळ स्पर्धा गुण व अव्वल क्रमांक म्हणजे शिक्षण न होता मानवतावाद याचा सर्वांगीण विकास करणे हे सर्वात मोठे आव्हान शिक्षण व्यवस्थेवर आहे. उदाहरण म्हणून द्यायचे झाले तर या स्पर्धा युक्त शिक्षणाच्या माध्यमातून एक मुलगा डॉक्टर झाला. तो डॉक्टर झाला खरा पण त्यामध्ये मूल्य व तत्त्वांची अभिरुची झालीच नाही. त्याने आपल्या ज्ञानाच्या साह्याने एक अगतिकच शोध लावला, एखाद्या पेशंटवर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्याला भूल दिली जाते, म्हणजे त्याचे शरीर बेशुद्ध केले जाते. या भुलीचा वापर स्वतःवर करून नशा तो करू लागला व एक दिवस त्यातूनच त्याचा मृत्यू झाला. तात्पर्य - तत्व किंव्हा मुल्यांशिवाय व्यक्ती केवळ शरीराने वा पदवीनेच डॉक्टर राहील.

शिक्षण प्रक्रियेमध्ये आधुनिकता, विकास, प्रगतीचे व ज्ञानाचे धडे देण्यापेक्षा मानवतेचे, तत्वज्ञानाचे व मूल्यांचे धडे देणे गरजेचे वाटू लागले आहे. त्यातूनच मुल्यशिक्षणाची गरज शालेय अभ्यासक्रमामध्ये प्रत्ययाने जाणवू लागली. त्याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांमध्ये दहा नैतिक मूल्यांची अभिरुची घडवून आणणे गरजेचे आहे.

नैतिक मूल्य म्हणजे काय?:-
व्यक्तींमध्ये ज्ञानाबरोबर शील, चारित्र्य, संस्कार याची रुजवणूक करणे याला नैतिक मूल्य अभिरुची असे आपण म्हणू शकतो.
ज्ञान आणि तत्व किंवा मूल्य या बाबतीत एक विसंगती आढळून येईल. ज्ञान मिळवता येते ते देता वा घेताही येते. मात्र मूल्य ही अंगीकारावीच लागतात व त्यांची रुजवणूक करणे अत्यंत गरजेचे असते. ज्ञान कोणत्याही वयात मिळवता येते मात्र वेळ निघून गेला असता मूल्यांचे पारायण करूनही काहीही उपयोग होनार नाही. या तत्त्वांची अभिरुची रुजवणूक करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य शिक्षण विभागाला करावे लागणार आहे यामधूनच खऱ्या अर्थाने माणूस हा माणूस म्हणून जगेल……..


दहा नैतिक मूल्य

वक्तशीरपणा
नीटनेटकेपणा
श्रमप्रतिष्ठा
सौजन्यशीलता
सर्वधर्मसहिष्णुता
राष्ट्रभक्ती
संवेदनशीलता
वैज्ञानिक दृष्टिकोन
राष्ट्रीय एकात्मता
स्त्री-पुरुष समानता